पुणे दि१८ :- पुणे भोसरी एमआयडीसी जवळच असलेल्या एका होटेल मध्ये १४ फेब्रुवारी २०१५ रोजी दारू पिण्याच्या वादातून एकाचा खून केल्याप्रकरणी आज दि १८, रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी सहा जणांना जन्मठेप आणि १५ हजार रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी ३० हजार रुपये मृताच्या कुटुंबियांना तर दोन जखमींना ३० हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. नागेश साहेबराव गायकवाड (वय २०), महेश उर्फ जॅकी मछिंद्र कांबळे (वय १९) , ओंकार सचिन बांदल (२३), विकी बबन ओव्हाळ (२०), दीपक श्रीरंग शिंदे (२९, पाचही रा. बालाजी नगर, भोसरी) आणि राजू भीमराव हाके (२१, आदर्शनगर, मोशी) अशी शिक्षा झालेल्या सहा जणांची नावे आहेत. रामा भीमराव गोटे (१९, बाळजीनगर, भोसरी) राजेश मनोहर स्वामी (१९, दापोडी), लखन कुमार गायकवाड (१९, बालाजीनगर, भोसरी) यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबत जखमी राजेश मनोहर स्वामी यांनी फिर्याद दिली होती.हा प्रकार १४ फेब्रुवारी २०१५ रोजी घडला होता. खटल्यात सरकारी वकील सुनील हांडे यांनी पंधरा साक्षीदार तपासले. त्यांना कोर्ट कामी पोलिस हवालदार दादासाहेब पांडुळे आणि पोलिस हवालदार नारायण पवार यांनी मदत केली. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी केला.घटनेच्या दिवशी जखमी स्वामी, गायकवाड आणि रामा गोटे तसेच आरोपी दीपक शिंदे आणि राजू हाके तसेच भोसरी एमआयडीसी जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये दारू पीत बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यावेळी बिल न देताच सर्व जण निघून गेले. त्यावेळी गोटेसह तिघे समझोत्यासह बालाजीनगरकडे जात असताना धारधार हत्यारासह उभ्या असलेल्या आरोपींनी तिघांवर सपासप वार करून गोटेचा खून केला. तर स्वामी आणि गायकवाड यांना गंभीर जखमी केले. आरोपींच्या या कृत्यामुळे भोसरी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.या बाबत सहा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. दरम्यान जखमी लखन गायकवाड याने केस मागे घ्यावी म्हणून त्याच्या आईवर आरोपी राजू हाकेच्या भावाने वार केले होते. त्याबद्दल गुन्ह्याही दाखल झाला होता. खटल्यात सरकारी वकील हांडे यांनी जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती.