पुणे,दि.२५ -: पुण्यातील खडकी पोलिस ठाण्याच्या समोरील चर्चा चौकात ट्राफिक अंमलदार ड्युटी करत असताना भरधाव कार जात असताना थांबविण्याचा प्रयत्न करणार्या वाहतूक पोलिसाला चालकाने चक्क बोनेटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.
सुरज भारत जाधव (29, रा. देहूरोड, मामुर्डी, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात पोलिस अंमलदार गणेश शिवाजी राबाडे (33, वाहतूक विभाग, खडकी) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिस अंमलदार राबाडे हे पोलिस हवालदार विजय धर्मा आढारी यांच्यासह खडकी पोलिस ठाण्याच्या समोरील चर्चा चौकात वाहतुक नियमन करत होते. त्यावेळी रेल्वे अंडरपासकडून लेन कट करून आलेल्या एक्सेंन्ट कार नंबर एमएच 12 क्युजी 4265 ला त्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी सुरज भारत जाधवने कार न थांबवता राबाडे यांच्यावर अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी राबाडे यांनी बॉनेटवर उडी मारली.
आरोपी सुरज जाधवने कार न थांबविता तशीच कार सुमारे 50 मीटर पुढे नेले आणि राबाडे यांना फरफटत नेले.
परिसरातील नागरिकांनी जाधवला कार थांबविण्यास भाग पाडले.
पोलिसांनी जाधव याच्याविरूध्द खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.
दरम्यान, या घटनेमध्ये राबाडे यांच्या डाव्या पायाच्या घोटयास मार लागला असून ते जखमी झाले आहेत.
गुन्हयाचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.