पुणे,दि.०२:- पोलीस असल्याचे सांगत पोलिसांचा गणवेश घालून चतु:श्रृंगी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मध्ये फिरणारा चतु:श्रृंगी पोलीसांच्या जाळ्यात, पेट्रोलिंग करणार्या चतु:श्रृंगी पोलिसांनाच त्याने औंध चौकीत नेमणूकीला असल्याचे सांगितल्याने त्याचे बिंग फुटले. पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
यशवंत रमेश धुरी (वय ३०, रा. काळेवाडी असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २९८/२३) दिली आहे. हा प्रकार औंध येथील राम नदीच्या पुलावर रविवारी दुपारी दीड वाजता घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक व त्यांचे सहकारी हे खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते.त्यावेळी राम नदीच्या पुलावर एक पोलीस उभा असल्याचे त्यांना दिसले.
तो अनोळखी वाटल्याने पोलिसांनी त्याला नेमणुकीस कोठे आहे, असे विचारले असता त्याने औंध चौकीला पोलीस असल्याचे सांगितले. खाकी ड्रेसच्या खांद्यावर म. पो. कॅपवर पिंपरी चिंचवड पोलीस असे लिहिलेले होते.त्यामुळे तो खोटे बोलत असल्याचे पोलिसांनच्या लक्षात आल्यावर त्याला चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आणले.अधिक चौकशी केली असता तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत असून मित्र मैत्रिणीवर
इम्प्रेशन मारण्यासाठी त्याने हा गणवेश घातला असल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस हवालदार कापरे हे करीत आहेत.