.पुणे,दिनांक २७ :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी ईव्हीएम /व्हीव्हीपॅट मशीनचे प्रथम यादृच्छिकीकरण (सरमिसळ) प्रक्रिया दिनांक 26 मार्च 2019 रोजी सकाळी10 वाजता सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, ईव्हीएम नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख यांचीही उपस्थिती होती.
मावळ लोकसभा मतदार संघासाठी एकूण 1238 मतदान केंद्रासाठी बॅलेट युनिट (बीयु) 1486,कंट्रोल युनिट (सीयु) 1486, वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडीट ट्रेल (व्हीव्हीपॅट) 1659 तसेच पुणे मतदार संघाच्या 1997 मतदान केंद्रासाठी बीयु2396, सीयु 2396 व्हीव्हीपॅट 2676आणि बारामती मतदार संघाच्या 2372मतदान केंद्रासाठी बीयु 2846, सीयु2846, व्हीव्हीपॅट 3178 व शिरुर मतदार संघाच्या 2296 मतदान केंद्रासाठी बीयु 2755, सीयु 2755व्हीव्हीपॅट 3077 असे एकूण 7903मतदान केंद्रासाठी बीयु 9484, सीयु9484 व्हीव्हीपॅट 10 हजार 590एवढ्या मशीन त्या त्या मतदार संघाच्या एकूण मतदान केंद्राच्या बीयु 120टक्के, सीयु 120 टक्के, व्हीव्हीपॅट 134 टक्के या प्रमाणात उपलब्ध प्रथम स्तरीय चाचणीत सुव्यवस्थीत असलेल्या मशीनचे यादृच्छिकीकरण/ सरमिसळ प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या मशीन संबंधित लोकसभा मतदार संघाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोडावूनच्या समोर उभारलेल्या मंडपामध्ये 21 मतदार संघाचे स्वतंत्र कंपार्टमेंट मधून करण्यात आली.
जिल्हा नियंत्रण कक्ष
भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेच्या निवडणूक विषयक तक्रारी स्वीकारण्यासाठी जिल्हास्तरावर 24 X 7 नियंत्रण कक्ष (कंट्रोल रुम) स्थापन करण्यात आला आहे. या कक्षासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
कोणत्याही व्यक्तीने केलेल्या तक्रारीची सदर नियत्रंण कक्षामध्ये नोंद घेण्यात येणार असून विविध पथकामार्फत त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. या नियंत्रण कक्षामध्ये जनतेला संपर्क करण्यासाठी पुढीलप्रमाणे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. 020 – 26121281, 26121291, 26121231, 26121271असे हे क्रमांक असून जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
मतदार यादीमध्ये नव्याने समाविष्ट मतदार
आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 1 लक्ष 47 हजार 739 इतक्या अर्जावर निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये साधारणपणे वरील प्रमाणे मतदानाची वाढ होणार आहे. पुणे व बारामती या लोकसभा मतदार संघामध्ये मतदार नोंदणीसाठी मुदत संपलेली आहे तर मावळ आणि शिरुर या लोकसभा मतदार संघातील जनतेला दिनांक 30 मार्च 2019 पर्यत नोंदणी करता येईल, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी कळविले आहे.
निवडणूक लढविणा-या उमेदवारासाठी खर्चाची दर सूची जाहीर
लोकसभा निवडणूक 2019 करिता निवडणूक लढविणा-या उमेदवारासाठी विविध वस्तूंच्या खर्चाचा दर (रेट लिस्ट) निश्चित करण्यात आलेली असून ही यादी निश्चित करताना मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या सूचना विचारात घेवून अंतिम करण्यात आलेली असून एक खिडकी योजनेच्या नोडल ऑफीसरमार्फत संबंधित उमेदवाराला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.