पुणे दि २६ : –पुणे शहरात वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या पुणेकर वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून आभार कुपन आता महिनाभर वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यापूर्वी आभार कुपन फक्त एकदाच वापरण्याची सूट देण्यात आली होती.नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी कुपन भेट देण्याची योजना पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. नियम पाळणारे वाहनचालक तसेच ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दंड नाही, अशा वाहनचालकांना पोलिसांकडून हे कुपन भेट देण्यात येते. वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या शहरातील नामवंत व्यावसायिकांच्या दुकानात खरेदी केल्यास दहा टक्के कुपनधारकांना सूट मिळते. यापूर्वी हे कुपन फक्त एकदाच वापरण्याची मुभा देण्यात आली होती. यापुढील काळात आभार योजनेअंतर्गत भेट देण्यात येणारे कुपन शहरातील अनेक नामवंत दुकानांमध्ये वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. महिनाभरात हे कुपन कितीही वेळा वापरण्याची मुभा देण्यात आली असून खरेदीवर दहा टक्के सूट मिळणार आहे.पोलिसांनी शहरातील ११५ नामवंत व्यावसायिकांना या योजनेत सहभागी करून घेतले आहे. शहरातील नामवंत मिठाई विक्रेते, उपाहारगृह, मॉल तसेच अन्य व्यावसायिक योजनेत सहभागी झाले आहेत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.
या योजनेत वाहनचालक त्यांच्यावर खटला दाखल आहे की नाही, याबाबतची माहिती mahatrafficechallan.gov.in./payechallan या संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळवू शकतील. एखाद्या वाहनचालकावर खटला दाखल नसल्यास ते कुपन मिळवू शकतात. नागरिकांना नियम पाळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून पोलिसांनी आभार कुपन भेट योजना राबविली आहे. – पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा पुणे शहर