पुणे दि,२६: – कोथरूडकर आणि पुण्याच्या समस्या सोडवून विकास पर्व कायम ठेवण्यास मी कटिबद्ध आहे, हा निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी पाळला आहे!विधानसभा निवडणूक निकालानंतर मुंबईत प्रदेश स्तरावरील बैठका आणि सरकार स्थापनेच्या घडामोडींमधून आवर्जून वेळ काढत चंद्रकांत दादा पाटील यांनी आज, शनिवारी कोथरूड संपर्क कार्यालयात नागरिकांच्या भेटी घेतल्या. कोथरूडमधील विजय आणि दिवाळीच्या शुभेच्छांचा त्यांनी विनम्रपणे स्वीकार केला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी सांगितलेल्या समस्यांचे तातडीने निराकरण आणि केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत कार्यवाही करण्यासाठी ठोस पावले उचलली!
भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल आनंदच आहे. त्याचप्रमाणे कोथरूडसारख्या मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याचादेखील आनंद आहे. पण सत्कार सोहळे करण्यापेक्षा नागरिकांना दिलेला शब्द पाळणे याला माझे प्राधान्य आहे. आणि त्याच दृष्टीने आजपासून कोथरूड संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू केली आहे, अशा शब्दात चंद्रकांत दादा पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.
पक्षाची प्रदेश स्तरावरील जबाबदारी, मंत्रिमंडळातील जबाबदारी आणि आणि आमदारकीची जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी विविध स्तरांवर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्याचादेखील चंद्रकांत दादा पाटील यांनी आढावा घेतला. याप्रसंगी संपर्क कार्यालयामध्ये कोथरूड, बाणेर, बालेवाडी परिसरातील संबंधित प्रभागांचे नगरसेवक उपस्थित होते. नागरिकांशी झालेल्या चर्चेदरम्यान संबंधित नगरसेवकांना चंद्रकांत दादा पाटील यांनी आवश्यक त्या सूचना देखील तातडीने दिल्या.तत्पूर्वी नगरसेवक किरण दगडे पाटील आणि पियुषा दगडे पाटील यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. पुणेकर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. पुणे आणि कोथरूडच्या विकासप्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना समान न्यायाने सहभागी करून घेतले जाईल, असे आश्वासन देखील चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी दिले.आज दिवसभरामध्ये विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या व्यक्तीकडे गाठीभेटीदेखील चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतल्या.