लातूर दि १७ : -जम्मू – काश्मीरमधील सियाचीन ग्लेसर येथे सीमेवर कर्तव्य बजावताना १३ जानेवारीला शहीद झालेल्या औसा तालुक्यातील आलमला येथील जवान सुरेश गोरख चित्ते यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात आलमला येथील रामनाथ विद्यालयासमोरच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर ओंकार कापले, शहीद जवान चित्ते यांचे कुटुंबिय यांच्यासह हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. प्रारंभी शहीद जवान सुरेश चित्ते यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली व रामनाथ विद्यालयासमोरच्या मैदानात अंतविधीच्या ठिकाणी आली. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार तसेच प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, सैन्य दला मार्फत कर्नल अजयजी फ्रांसीस, पोलीस दला मार्फत पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनी पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली.यावेळी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पाठवलेल्या शोक संदेशाचे वाचन मोईज शेख यांनी केले. यावेळी सैन्य दल व पोलीस दला मार्फत शहीद जवान सुरेश चित्ते यांना हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी आलमला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या मुखातील “वीर जवान अमर रहे, वीर जवान अमर रहे” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शहीद जवान सुरेश चित्ते यांच्या पार्थिवास त्यांचे पुत्र आदर्श व लहान बंधू धीरज यांनी अग्नि दिला. शहीद जवान सुरेश चित्ते यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा व लहान भाऊ असा परिवार आहे.
औसा लातूर प्रतिनिधी :-प्रशांत नेटके